पुणे - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लसीकरता वापरलेल्या ‘कोविशिल्ड’ नावावर एका औषध कंपनीने आक्षेप घेतला आहे. नांदेड येथील कुटीस बायोटेक कंपनीने हा आक्षेप घेतला असून, यासंदर्भात पुणे न्यायालयात कंपनीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.
मागील दहा महिन्यांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी भारतासह जगभरातील कंपन्या प्रयत्न करत आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील कोरोनावर लस उत्पादन सुरू केले असून, सिरमची लस नेमकी केव्हा बाजारात येईल
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड ही लस लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा असताना कुटीस बायोटेक कंपनीच्या संचालिका अर्चना आशिष काब्रा यांनी याप्रकरणी सिरम संस्थेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सीरमच्या आधीपासून ‘कोविशिल्ड’ नाव वापरत असल्याचा दावा
कुटीस बायोटेक कंपनी हॅंड सॅनीटायझर, फ्रुटस ऍण्ड व्हेज शिंग लिक्विड, सरफेस डीकन्टामेंट स्प्रे ही उत्पादने बाजारात ‘कोविशिल्ड’ ब्रॅंडच्या नावाने विक्री करत आहे. ‘कोविशिल्ड ब्रॅंड नावाने त्यांनी 29 एप्रिल 2020 रोजी फार्मासक्युटिकल उत्पादने विक्रीसाठी अर्ज केला आणि 31 मे 2020 रोजी कोविशिल्ड ट्रेडमार्कने उत्पादने विक्रीला सुरुवात केली. त्यामुळे सिरमच्या आधीपासून कोविशिल्ड नावाचा वापर आम्ही सुरू केला असून, सीरमने त्यांच्या लसीकरता दुसरे नाव वापरावे अशी मागणी कुटीस बायोटेकच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित कुटीस बायोटेक कंपनी 2010 मध्ये रजिस्टर झालेली असून, 2013 पासून फार्मासक्युटिकल उत्पादनांचा व्यवसाय करत आहे.