पुणे - प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज (Deccan College Pune) येथे मांजर आणि कुत्र्यांचा पेटगाला हा पेट शो (Petgala Pet Show) नुकताच संपन्न झाला. या पेट शो मध्ये जगभरातील विविध जातीच्या मांजरी आणि कुत्रे पाहायला मिळाले. याला पुणेकरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून देशभरातील विविध ठिकाणाहून नागरिकांनी आपल्या मांजरी तसेच कुत्रे येथे विविध पोशाखात आणले होते. (Pet Show in Pune).
कार्यक्रमात दत्तक मोहिमेचा समावेश - पेटगाला पेट शो अंतर्गत आणि मार्स पेट केअर द्वारे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात दत्तक मोहिमेचा समावेश ही कार्यक्रमाची उजवी बाजू ठरली. या मोहिमेचा उद्देश म्हणजे शक्य तितक्या जास्त मांजरी आणि कुत्र्यांना अशा घरामध्ये दत्तक द्यायचे जिथे त्यांची विशेष काळजी आणि निगा राखली जाईल. बऱ्याच पुणेकरांनी मांजरी आणि कुत्र्यांना दत्तक घेऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चार विदेशी परिक्षक - पेटगाला हा पाळीव प्राणी प्रेमींचा एक आकर्षक मेळावा असून या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा आनंद साजरा करण्याची एक खास संधी प्रत्येकाला दिली जाते. फेलाइन क्लब ऑफ इंडिया, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पोषण यामधील प्रमुख यांच्या संयुक्त विद्यमाने चार आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला. अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), जॅन रॉजर्स (यूएसए), फडली फुआद (इंडोनेशिया) आणि इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) यांनी या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण केले आहे. या कार्यक्रमात 200 हून अधिक मांजरींचा सहभाग असल्याची माहिती FCI चे अध्यक्ष साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि इंडीमाऊ यांसारख्या विविध जातींच्या मांजरी कार्यक्रमादरम्यान उपस्थित होत्या.