पुणे - जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे भरदिवसा एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. शिक्रापूर पोलिसांनी घटनेची दखल घेत एका तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे. अनैतिक संबंधातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती दिली आहे. नवनाथ संपत चौधरी, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीत ही घटना घडली. तळेगाव-न्हावरा रस्त्याच्या बाजूला शासकीय गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या जवळ असलेल्या प्रतिभा दूध डेअरी समोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. दिनांक ५ जूनला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.
या व्यक्तीची डोक्यासह कपाळावर दगडाने वार करुन हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी तपास पथकाची पोलिसांनी नेमणूक केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी हरीश सुधाकर काळे ( वय २५ वर्ष , रा. खंडोबाची आळी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) याला एका तासाच्या आत अटक केली. पोलिसांच्या तपासात आरोपीने अनैतिक संबंधातून नवनाथ संपत चौधरी (रा. पाबळ,ता.शिरुर, जि. पुणे) याची हत्या केल्याचे निष्पन्न होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.