पुणे - आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास एक हजार आठशे साधक लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्ये अडकले होते. यातील पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील 250 साधकांना बुधवारी रात्री उशीरा घरी पोहोचवण्यात आले. यानंतर प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.
खबरदारी म्हणून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यातून मार्च महिन्यात 250 पेक्षा अधिक साधक आध्यात्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानात गेले होते. परंतु, अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्व साधक राजस्थानमध्येच अडकले.
या साधकांनी महाराष्ट्रात परतण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला. वळसे पाटील हे त्यांच्या मदतीला धावून गेले. यामुळे, सर्व साधकांची घरवासी झाली आहे. खबरदारी म्हणून घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून त्यांना देण्यात आल्या आहेत.