पुणे - पुणे महापालिकेत नवीन गावांचा समावेश झाला आहे. मात्र, यानंतर मोठ्या प्रमाणावर या गावांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. मनपा व ग्रामपंचायत यांच्या वादात मांजरीकर सापडले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मांजरीमधील कचरा गेली 20 दिवस उचलला नसल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त झालेत. येथील नागरिकांनी आज जमा झालेल्या कचऱ्यात बसून आंदोलन केले.
हेही वाचा - बुलडाणा : देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा 4 बालकांवर हल्ला
कचराप्रश्नी मांजरीकर त्रस्त.. अनेक समस्यांना द्यावे लागतेय तोंड
पुण्यातल्या मांजरीमध्ये कोरोनाची लस तयार झाली. त्याच ठिकाणी कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. मनपामध्ये भाजपची सत्ता आहे आणि ग्रामपंचायतीतही भाजपच आहे. मात्र, हे गाव मनपामध्ये घ्यायला भाजपचा विरोध होता, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. तरीही हे गाव राज्य शासनाच्या निर्णयामुळे मनपामध्ये गेले आहे. हा निर्णय चांगला असला तरी आता या गावाची जबाबदारी ना मनपा घ्यायला तयार आहे, ना ग्रामपंचायत घ्यायला तयार आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसत असून येथील कचरा-उठावासारखी मूलभूत कामेही रखडली आहेत. 20 दिवस झाले, या भागातील कचरा उचला नसल्याने मोठी दुर्गंधी परिसरात पसरली आहे. यामुळे स्वच्छतेची आणि स्थानिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. येथील रहिवाशांसह हॉटेल व्यावसायिकांनाही याचा त्रास होत आहे. लोक हॉटेलमध्ये यायला तयार नाहीत. त्यामुळे हॉटेलही बंद करावी लागली आहेत. जेष्ठ नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी स्थानिक कचऱ्यात बसून आंदोलन करत आहेत. मात्र, पालिका यावर काही बोलत नाही. आम्ही मोकळा श्वास कसा घ्यायचा, असा प्रश्न स्थानिक करत आहेत.
'गेल्या २० दिवसांपासून परिसरातील कचरा उचलला गेलेला नाही. आज आम्ही ४ लोकच मिळून आंदोलन करत आहोत. पण येत्या १५ दिवसांत हा कचरा उचलला नाही तर, आम्ही सर्व स्थानिक लोक मिळून कचऱ्यात बसून आंदोलन करू, असा तीव्र इशारा महेश नलावडे यांनी या वेळी दिला. कचऱ्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज आपण कोरोनाविरोधात लढत आहोत. अशा स्थितीत स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेला हलगर्जीपणा अक्षम्य आहे. येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. लोक आजारी पडत आहेत. मात्र, प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. प्रशासनाने लवकरच यात लक्ष द्यावे अशी मागणी आम्ही करत आहोत,' असे नलावडे म्हणाले.