पुणे - आपल्याला रोगाशी लढायचं, रोग्याशी नाही' ही कोरोनाची टॅगलाईन आहे. परंतु, सध्या समाजात याउलट होताना दिसत आहे. बाधित रुग्णावर, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात सापडलेल्या कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वाहनचालकाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कोरोनाने त्यांचा व्यवसायच हिरावला आहे.
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला सापडला होता. दुबईहून आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. हे दाम्पत्य दुबईहून विमानाने मुंबईला आले. तेथून पुण्याला टॅक्सी करून आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये पुण्यातील टॅक्सी चालकाचाही समावेश होता.
पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या चालकानी तब्बल महिनाभर नायडू रुग्णालयात उपचार घेतले आणि बरे होऊन ते घरी परतले. परंतु, घरी परतल्यानंतरही कोरोनाने त्यांना सोडले नाही. घरी आल्यानंतर त्यांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले.
उपजीविकेसाठी विकतात कडधान्य -
कोरोनामुक्त झाल्यापासून ते घरीच बसून आहेत. त्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. परंतु, त्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांचे नाव सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. कोणीही त्यांच्याकडे गाडी बुक करण्यासाठी येत नाही. त्यांच्या दोन गाड्या बऱ्याच दिवसापासून एकाच जागी उभ्या आहेत. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी ते रस्त्याच्या कडेला उभे राहून कडधान्य विकण्याचे काम करतात.
तेव्हा पोलिसातही दिली होती तक्रार -
सोशल मीडियावर नाव व्हायरल झाल्यानंतर व्यवसायावर परिणाम होऊ नये. कुटुंबाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये. यासाठी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, त्याचा जास्त फायदा झाला नाही. आता त्यांचा संपूर्ण व्यवसाय ठप्प आहे. त्यांची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. त्यात नागरिकांनी त्यांनी अशी हीन वागणूक देणे चुकीचे आहे.