पुणे- शहरात सध्या हेल्मेटसक्ती सुरू असून याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. पुणे शहरातील विविध भागातील चौकात तसेच मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस गटागटाने उभे राहून कारवाई करत आहेत. शिवाय नाकाबंदी करत गाड्या अडवून अनेक वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे. याच कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन दुचाकीस्वाराकडून तब्बल २१ हजार ५०० रुपायांचा दंड वसूल केला आहे.
वाहतूक पोलिसांजवळ असलेल्या मशीनमध्ये कुठल्याही गाडीचा क्रमांक टाकला असता, त्याच्यावर वाहतूक नियमभंगाचा कुठला दंड शिल्लक राहिला आहे का? याची माहिती मिळत आहे. त्यानुसार त्याचीही तपासणीही सध्या वाहतूक शाखेचे पोलीस करत आहेत.
एक जानेवारीपासून हेल्मेट न घालणाऱ्या आणि वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणारे चालक, चुकीच्या दिशेने येणारे वाहनचालक, हेल्मेट न घालणारे वाहनचालक यांच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. नाकाबंदीत पकडल्या गेलेल्या वाहनचालकांकडून असा दंड त्वरित वसूल करण्यात येतो.
पुण्यातील बुधवार पेठ आणि सहकारनगर परिसरात अशाच एका कारवाईत आज २१ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सहकारनगर येथे पकडलेल्या वाहनचालकाकडून ११ हजार ४०० तर बुधवार पेठेत पकडलेल्या वाहनचालकाकडून १० हजार १०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियमभंग होणार नाही याची काळजी घ्यावी.