पुणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ आणि शिरूर मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, दोन्ही मतदार संघात सुमारे ६० टक्के मतदान झाले असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मात्र, दोन्ही मतदारसंघातील निवडणूक शांततेत पार पडली असली तरी, पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांमध्ये ४८ हजार रुपये वाटण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाला मिळाली होती. तसेच शिरूरमध्ये एव्हीएमचे छायाचित्र काढल्याची बातमी माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. या घटनेची दखल घेत निवडणूक विभागाने शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
तरी पुण्यातील सर्व मतदार संघातील निवडणूक संपली असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या परवानगीने जिल्ह्यातील आचार संहिता शिथिल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही नवल यांनी सांगितले.
मावळ आणि शिरूर दोन्ही मतदारसंघातील निवडणूक जरी शांततेत पार पडली असली, तरी पैसे वाटप आणि एव्हीएमचे काढलेल्या छायाचित्रसारख्या प्रकारामुळे निवडणुकीस गालबोट लागलल्याची चर्चा सुरू आहे.