पुणे - शहरात फक्त पुणे शहरातील नव्हे तर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरचे रुग्ण देखील येत आहेत. दर दोन दिवसाला खासगी रुग्णालयांकडून माहिती घेतली जात आहे. पुणे शहराची परिस्थती पाहता शहरात नक्कीच क्षमता वाढवण्याची गरज आहे. ग्रामीण भागात देखील पुढील ३ दिवसात १ हजार ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाली असून त्याचे काम ५० टक्के झाले आहे. खेड, मंचर, बारामती याठिकाणी आयसीयू बेड्सची सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
ग्रामीण भागात काही खासगी रुग्णालये देखील बेड उपलब्ध करत आहेत. ससूनमध्ये जास्तीत जास्त बेड्स कसे वाढवण्यात येईल, यावर जास्त भर देणार आहोत. बाकीचे रुग्णालय सेवा देत आहे. दररोज काहींना काही बेड्स वाढवत आहोत. दररोज रुग्णही वाढत आहेत आणि प्रत्येक दिवशी दहा-वीस बेड्स वाढवणे हे योग्य नाही. तर आम्ही कायम यावर उपाय म्हणून काम करत आहोत. पुढील आठवड्यात कमीत कमी २५० आयसीयू बेड वाढवण्यात येणार आहे. काल (रविवार) जी माहिती देण्यात आली की, एकच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहे. तर तशी काहीही परिस्थिती नसून नवीन काही खाजगी रुग्णालये जोडले जात आहे. मात्र, यात रियल टाईम एंट्री होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त लक्ष देत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - देशात कोरोनाचा विळखा घट्ट; गेल्या 24 तासात 40 हजार 425 जणांना संसर्ग
येणाऱ्या काळात प्रत्येक हॉस्पिटल दहा ते १४ टक्के बेड्स वाढवणार आहे. सुरूवातीला आम्ही १०० बेड्स असलेल्या रुग्णालयांवर लक्ष देत होतो. पण आता आम्ही सर्वांवर लक्ष देत आहो. नक्कीच ही अडचण पुण्यात जास्त काळ चालणार नाही. पुढे कोणीही बेडसाठी तक्रार करणार नाही. अशी व्यवस्था तयार करण्यात येणार, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजअखेर प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. तर त्याच दरम्यान तपासण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड्स कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल असा अंदाजही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
डॅशबोर्डवर माहिती अपडेट न झाल्याने गैरसमज...
डॅशबोर्डवर अपडेट झाली नसल्याने शहरात एकाच व्हेंटिलेटर आहे, अशी माहिती दिली जात होती. आता ७ व्हेंटिलेटर संचेती हॉस्पिटल, ७ जहांगीर, १५ ससून आणि आज परत १५ ससूनला मिळणार आहे. म्हणून ४० ते ४५ व्हेंटिलेटर शहरात उपलब्ध आहे. या विषयी मी सुद्धा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त याच्याशी चर्चा केली आहे. अपडेट न झाल्याने एकाच व्हेंटिलेटरची माहिती समोर आली आहे. तांत्रिक चूक असल्याने संबंधितांवर कारवाई करू, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.