दौंड(पुणे) - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत एका टेम्पो चालकाला शनिवारी लुटण्यात आले होते. चोरट्यांनी चालकाकडील ३० लाख रुपयांची रक्कम पल्सरवरुन आलेल्या चार जणांनी लुटली होती. ही घटना शनिवारी (२९ ऑगस्ट ) रात्री ८.३० वाजता घडली होती. या चोरीतील एका आरोपीला पाटस पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब पानसरे आणि पोलीस मित्र सोनबा देशमुख यांनी पाटस टोल नाक्याजवळील एका हॉटेल मधून पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून २ लाख १० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. संबधित आरोपीला दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मळद येथे टेम्पो चालकाला लुटण्यात आल्याची माहिती मिळताच दौंड पोलिंसानी वेगाने तपास करण्यास सुरुवात केली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी संबंधित चोरटे पाटस टोल नाक्याच्या दिशेने गेल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणेद्वारे दिला. ही माहिती मिळाल्याने पाटस पोलिसांनी टोल नाक्यावर बारकाईने तपासणी सुरू केली. मळद येथे वाहन चालकाला मारहाण करत रक्कम घेऊन पसार झालेल्या चोरटयांनी पाटस येथे बारामती रोडवर दुचाकी टाकून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला होता, यामुळे पोलीस रात्रभर आरोपींचा शोध घेत होते.
हेही वाचा-पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्लाझ्मा डोनरर्सचा सत्कार
प्रकाश पांडुरंग गोरगल (वय ३६ रा.वाखारी ता.दौंड ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यामध्ये पाच जण सामील असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी अडीच तासात दुचाकी व एकूण आठ लाख वीस हजार रुपये जप्त केले आहेत.
पाटस पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे ग्रामस्थांनी कौतुक केले. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, हवालदार बाळासाहेब पानसरे संतोष मदने, घनश्याम चव्हाण, सागर चव्हाण, समीर भालेराव, पोलीस मित्र सोनबा देशमुख यांच्या पथकाने तपास केला.