पुणे - पुणे शहरात खासगी शाळांकडून सुरू असलेल्या मनमानीच्या विरोधात पालकांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. खासगी शाळांकडून मनमानी सुरू आहे. याविरोधात पालक एकत्र येऊन आपल्या समस्या मांडत आहेत. अनेक शाळा बंद असतानाही शाळांकडून फीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
शाळा सुरू नसतानाही फीसाठी तगादा
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंद्यांवर देखील परिणाम झाला आहेत. मात्र असे असताना देखील खासगी शाळा पालकांना फी भरण्यासाठी सांगत आहेत. विशेष म्हणजे शाळा अद्याप सुरू देखील झाल्या नाहीत, अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग देखील सुरू नाहीत, तरी देखील शाळा फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत, अशी तक्रार पालकांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रचंड आर्थिक झळ बसली आहे. अशा परिस्थितीमध्ये फी भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल देखील या पालकांनी उपस्थित केला आहे. पालकांनी एकत्र येऊन याविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र शिक्षण विभागाकडून देखील तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने, पालक अडचणीत सापडले आहेत.