पुणे - सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. पण, पुण्यात मात्र अशाप्रकारे फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका महिलेने इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाला पुण्यात भेटण्यासाठी बोलावले. त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतर त्या महिलेच्या साथीदारांनी त्याला लुबाडले. पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिलेसह चौघांवर भा.दं.वी.चे कलम 394, 341, 388, 506, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुण हा पनवेलचा रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची एका महिलेसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली, एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. एके दिवशी या महिलेने पीडित तरुणाला पुण्यात भेटण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. या तरुणाने ही हे आमंत्रण स्वीकारले आणि 7 ऑगस्टला तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यातील कोंढवा परिसरातील येवलेवाडी भागात आला. भेटल्यानंतर ही महिला त्याला एका ठिकाणी घेऊन गेली आणि तिने त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
काही वेळानंतर हा तरुण परतत असताना तीन जणांनी या तरुणाची चारचाकी अडवली आणि जबरदस्तीने कारमध्ये प्रवेश केला. काहीही न विचारता त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच "तू इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका महिलेवर बलात्कार केला आहेस, तुझी पोलिसात तक्रार देतो", असे म्हणत त्यांनी या तरुणाला धमकावण्यास सुरुवात केली. या तिघांनी तक्रारदार तरुणाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच हे पैसे न दिल्यास त्या महिलेसोबत लग्न करावे लागेल असे कोऱ्या कागदावर लिहून घेत त्याची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर त्याच्याजवळ रोख 50 हजार रुपये व एटीएममधून 30 हजार रुपये, असे 80 हजार रुपये काढून घेतले.
या सर्व प्रकारानंतर तक्रारदार तरुण घरी गेला. काही दिवसांनी आरोपींनी पुन्हा त्याच्याकडे उर्वरित पैशाची मागणी केली. वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे तरुणाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - धक्कादायक! पुण्यात वक्फ बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची 7 कोटींची फसवणूक