पुणे - पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आणि माझा सगळा भूतकाळ जिवंत झाला, हा पुरस्कार मिळणे हा चमत्कार आहे. हा मला मोठा सुखद धक्का आहे, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दिली.
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल बोलताना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, पुरस्कार जाहीर झाला आणि मला माझी मुले आठवायला लागली, मला पोटाची भूक आठवायला लागली, लेकरांचे तडफडणे आठवायला लागले. उघडी-नागडी लेकरं स्टेशनवर झोपलेले आठवायला लागले, स्मशानात खालेली भाकरी आठवायला लागली आणि माझा भूतकाळ झरकन डोळ्यासमोरून गेला.'
मी दुःखाचे पहाड ओलांडले. तुम्ही ही दुःखाचा सामना करा, दुःख आले म्हणून कुरवाळत बसू नका. नवीन दिवस उगवत असतो. रस्त्यात काटे आले म्हणून घाबरू नका. काटे टोचतील म्हणून थांबू नका चालत रहा, असा संदेश या निमित्ताने सिंधुताईंनी सर्वांना दिला. मी करत असलेल्या कामात माई एकटी पुरणार नाही, आता तर मला डबल झेप घ्यायची आहे. मात्र त्यासाठी तुम्ही सर्व सोबत हवे आहात, अशी साद देखील सिंधुताईंनी यावेळी घातली.
हेही वाचा - बारामतीतील खासगी व शासकीय कार्यालये, दवाखान्यांची फायर फायटिंग यंत्रणा रामभरोसे
हेही वाचा - जास्त खोलात जाऊ देऊ नका, उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा