पुणे - केंद्र सरकार आयुध निर्माण कंपनीचे खासगीकरण करीत असल्याचा आरोप करत कंपनीचे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी एक महिन्यांचा संप पुकारला आहे. देशात एकूण ४१ आयुध निर्माण कंपन्या असून त्यामधील १ लाख कर्माचारी संपवार गेले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण दहा आयुध निर्माण कंपन्या आहेत. त्यामध्ये पुणे ३, अंबरनाथ (मुंबई) २, नागपूर १, भंडारा १, चंद्रपूर १, वरणगाव १, भुसावळ १ आहेत. यामध्ये तब्बल ५० हजार कर्मचारी काम करतात. या कंपन्यांद्वारे तिन्ही सशस्त्र दले, सर्व नीमलष्करी दले, सर्व केंद्रशासित पोलीस दले यांना दारुगोळा आणि वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे पुरवतात. मात्र, आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे सर्व कर्मचारी संतापले असून त्यांनी तिव्र निषेध व्यक्त केला आहे.
सद्य स्थितीला केंद्र सरकारने सर्व भारतीय आयुध निर्माण कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. कर्मचारी, कामगार संघटनांना त्यांनी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील तब्बल १ लाख कर्मचारी व त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.