पुणे - खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे लागवडीला आलेली कांद्याची रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दुसऱ्यांदा लावलेली कांदा रोपे खराब झाल्याने यंदा कांदा लागवड करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. रोपे खराब झाल्याने यंदा कांदा लागवडीमध्ये निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.
सध्या कांदा लागवड सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी लागणारी रोपे उपलब्ध नसल्याने कांदा लागवड संकटात आहे. सातगाव पठार परिसरातील राजेंद्र धुमाळ या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतात कांदा लागवड करण्यासाठी चार हजार रुपये प्रति किलोप्रमाणे 60 हजार रुपयांचे पंधरा किलो कांदा बियाणे लावले होते. मात्र, वातावरणातील बदलामुळे रोगराई पसरून ते बियाण उगवलेच नाही. त्यांनी तातडीने दुसऱ्यांदा कांदा बियाणाची लागवड केली. दुसऱ्यांदा पेरलेल्या बियाणाचे रोपे तयार झाली आणि त्याच वेळी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे काहा रोप वाहून गेले तर काही सडून गेले. धुमाळ यांच्या सारखीच परिस्थिती शेकडो शेतकऱ्यांची आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात 90 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कांदा लागवड होत असते. मात्र, यंदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.