पुणे - सध्या कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी प्राण्यांचीही वणवण सुरु आहे. पाण्याच्या व शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना जुन्नर तालुक्यातील धोलवड गावात शंकर नलावडे या शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या मृत स्थितीत आढळून आल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
जुन्नर तालुक्यातील पाण्याची अवस्था भीषण असून विहिरींनी तळ गाठला आहे. अशातच बिबट्या हा प्राणी रात्रीच्या वेळी भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात बाहेर पडतो, खोल विहीरीत पडल्याने बिबट्यालाही आपला जीव गमवावा लागतो. या मृत बिबट्याला ओतूर वनविभागाने बाहेर काढले असून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
जंगल वस्तीत अधिराज्य करणारा बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून ऊस शेतीला जंगल समजून लोकवस्तीत घुसत आहे. सध्या संपूर्ण परिसरात ऊसतोड सुरू असल्याने बिबट्या हा उघड्यावर पडला आहे. बिबट्याची शिकार व पाण्याच्या शोधात भटकंती सुरु झाली आहे. त्यातच कडाक्याच्या उन्हाचा फटकाही बिबट्याला बसत आहे.