पुणे- येथील पिंपरी-चिंचवडच्या देहूरोड येथे एक लाख भीम अनुयायांनी महाबुद्ध वंदना म्हटली. यावेळी पटांगणात भीम अनुयायांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले दिसत होते. अगदी एकाच रांगेत हजारो अनुयायी बसलेले होते. यामुळे देहूरोड येथील वातावरण बुद्धमय झाले होते. २५ डिसेंबर १९५४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या ऐतिहासिक दिवसाला आज ६५ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने एक लाख भीम अनुयायींनी महाबुद्ध वंदना म्हटली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ ला स्वतःच्या हाताने देहूरोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. हा ऐतिहासिक वारसा जपला गेला आहे. दरवर्षी लाखो अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येतात. याचे औचित्य साधून एक लाख भीम अनुयायांनी महाबुद्ध वंदना म्हटली आहे. दरम्यान, यासाठी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले येथे मुक्कामी असताना १९३५ साली भीम गर्जना केली होती की, मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही.
त्याच पार्श्वभुमीवर देहूरोड येथे आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ साली स्वतःच्या हाताने बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती. आज २५ डिसेंबरला या ऐतिहासिक घटनेला ६५ वर्ष पूर्ण झाले. पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या धम्मभुमीवर एक लाख लोकांच्या साक्षीने आणि शंभर भंते यांच्या हस्ते धम्म वंदनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. मात्र, त्या अगोदर १९५४ ला देहूरोड येथे बुद्धमूर्ती प्रतिस्थापना केल्यामुळे या भुमीला वेगळे महत्त्व आहे.