पुणे - बारामतीत आणखी एक नवा कोरोना रुग्ण आढळून आला आहे. शहरातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असणाऱ्या आमराई भागातील एका २९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. सदर कोरोनाबाधित व्यक्तीची बारामतीतील खासगी रुग्णालयात स्वॅब घेऊन चाचणी करण्यात आली होती. यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आमराई परिसरातील नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
आमराई परिसरातील दाट लोकवस्तीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने तात्काळ परिसरात औषध फवारणी करून योग्य त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरातील सुहासनगर घरकुल ते सिध्दार्थनगर चौक, सचिन काकडे किराणा दुकान ते दामोदरे रॉकेल दुकान, धनंजय तेलंगे दुकान ते वसाहत चौक ही सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
लॉकडाऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि सामाजिक अंतर ठेवा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.