आळंदी (पुणे) Kartiki Ekadashi : ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर या भावनेनं राज्यभरातून आलेल्या असंख्य भाविकांमुळं अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघालीय. तसंच यंदाच्या कार्तिकी यात्रेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला असून शुक्रवारी (8 डिसेंबर) रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळं दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग पूजेसाठी बंद ठेवण्यात आलीय. मध्यरात्रीच्या सुमारास स्वकाम सेवा मंडळाच्या सभासदांनी संपूर्ण देऊळवाडा धुवून स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर साडेबारा ते दीडपर्यंत संजीवन समाधीवर 11 ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान विधिवत अभिषेक करण्यात आला.
यावेळी सनई चौघड्यांच्या मंगल स्वरानं मंदिरातील वातावरण अधिक भक्तिमय झालं होतं. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीनं दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आलं.
आडे कुटुंबाला मिळाला दुसऱ्यांदा महापूजेचा मान : कार्तिकी एकादशीचे मानाचे वारकरी म्हणून शेषराव सोपान आडे (वय 60), गंगुबाई शेषराव आडे (वय 55) (रा. परतवाडी ता. परतूर जि. जालना) यांना महापूजेचा मान मिळाला. 2021 ला सुद्धा माऊलींच्या महापूजेचा त्यांना मान मिळाला होता. आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील, हभप भावार्थ देखणे, योगी निरंजननाथजी, ॲड.राजेश उमाप यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळप्रसाद देण्यात आला.
"ही माऊलींची कृपा आहे. आम्ही सात तास दर्शनरांगेत उभे होतो. मागील 30 वर्षांपासून सपत्निक आषाढी अन् कार्तिकी वारी करत आलोय. आई-वडिलांच्या पुण्याईमुळं हा योग घडून आला."- शेषराव सोपान आडे, वारकरी
यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, चैतन्य महाराज लोंढे, डि. डि. भोसले पाटील, सचिन गिलबिले, सागर भोसले, संजय महाराज घुंडरे, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले तसंच प्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते.
हेही वाचा -
- 'विश्वची माझे घरा'चा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आळंदीत ग्रामस्थ नाराज, कार्तिक यात्रेतच करणार गाव बंद
- Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीला आळंदीमधील संस्थेची जमीन ताब्यात घेणे बेकायदेशीर... एमआयटीची मुंबई उच्च न्यायालयात धाव
- Dnyaneshwar Maulis palakhi : सातारा जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश