पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध संस्था संघटनांच्या वतीने देखील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन, प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेतर्फे दरवर्षी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. यंदा संस्थेकडून जयंतीनिमित्त घर घर संविधान ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
10 हजार संविधान ग्रंथाचे वाटप : याबाबत वारे म्हणाले की, बार्टीकडून जे काही ग्रंथ डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचं ग्रंथ म्हणजे संविधान ग्रंथ आहे. याच संविधनामधील विचार नागरिकांपर्यंत तसेच घरोघरी पोहचावे या उद्दिष्टाने संविधानाच्या स्पेशल प्रिंटिंगची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र मेहनत घेत प्रिंटिंग देखील करण्यात आले आहे. आत्ता 10 हजार संविधान ग्रंथ उपलब्ध होणार आहे. हे संविधान ग्रंथ घराघरापर्यंत पोहचावे या उद्देशाने ही मोहीम सुरू केली आहे. याची सुरवात या आंबेडकर जयंतीच्या पासून होणार असल्याचे यावेळी वारे यांनी सांगितले. ही मोहीम खूप मोठी असून याची सुरवात बार्टीच्या येरवडा येथील ग्रंथालय येथून होणार आहे. येणाऱ्या सर्वांना संविधान ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. या योजनेचा पाहिला भाग म्हणजे जो मागेल त्याला संविधान देण्यात येईल. यानंतर समता दुतांच्या माध्यमातून हे ग्रंथालय गावोगावी जाऊन देण्यात येणार आहे, असे देखील यावेळी वारे म्हणाले.
बाबासाहेबांच्या विदेश प्रवासावर संशोधन : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 1923 साली लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सकडून पीएचडी पदवी मिळाली होती. प्रॉब्लेम ऑफ रुपी हे त्यांच्या ग्रंथाचे नाव होत. त्या घटनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेबांचा विदेश प्रवास जिथे जिथे झाला त्या त्या देशांमधे देखील बाबासाहेब कुठे गेले. यावर संशोधन करण्यात येणार आहे. बाबसाहेबांनी विदेशात काय काय केले. याचा सर्व अभ्यास संशोधनात करण्यात येईल अशी माहिती वारे यांनी दिली आहे. तसेच बार्टीच्या वतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुलांना ट्रेनिंग, प्लेसमेंट ओब्रॉड हे उपक्रम स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत उपक्रम घेण्यात येणार आहे. या मुलांना ट्रेनिंग देऊन विविध देशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वारे यांनी दिली आहे.
पुस्तकांवर 15 टक्के सुट : यंदाच्या या जयंतीला समता पर्वच्या अनुषंगाने 10 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये ऑनलाइन व्याख्यान घेण्यात येत आहे. तर 14 एप्रिल रोजी 'बार्टी मुख्यालय ते पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या पर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समतादूतांमार्फत संपूर्ण राज्यभर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तालुका, तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्याने यांचे आयोजन, 18 तास वाचन करण्यात येणार आहे. आज आणि उद्या समतादूत यांच्या उपस्थितीत राज्यभर वस्ती भेटीचे कार्यक्रम होणार आहे. मुंबई चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांकरिता पुस्तकांवर 15 टक्के सुट देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत.