पुणे - शहरात सध्या मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचे खांबही उभे आहेत. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचे कामही वेगात सुरू आहे. यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरू आहे. बुधवारी खोदकाम सुरू असताना या ठिकाणी भुयारी मार्ग सापडला आहे.
जमिनीच्या १२ ते १५ फूट खाली असलेल्या या भुयाराचे बांधकाम पक्क्या स्वरूपाचे आहे. बुधवारी या ठिकाणी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरू होते आणि याचदरम्यान येथील जमीन खचली आणि खोल खड्डा असल्याचे समोर आले. यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरून पाहिले असता हा भुयारी मार्ग असल्याचे निष्पन्न झाले. या भुयारी मार्गाला दोन भिंती आहेत. एक सारसबागेच्या बाजूने तर दुसरी टिळक रस्त्याच्या बाजूने आणि भिंतीमध्ये पाईप आहेत.
मेट्रोचे अधिकारी वसंत सावंत यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी आता मेट्रोचे मल्टिमोडल हब तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी पूर्वी महापालिकेचा जलतरण तलाव होता. आणि येथून जवळच कॅनॉल आहे. या भुयारी मार्गाद्वारे कॅनालचे पाणी जलतरण तलावासाठी आणले जात असावे, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हा भुयारी मार्ग ५७ मीटर लांबीचा असून एकाचवेळी दोन ते तीन व्यक्ती या बोगद्यातून सहज जाऊ शकतात. २५ ते ३० वर्षांपूर्वीचे हे बांधकाम असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले की, पूर्वी नेहरू स्टेडियमसमोर महापालिकेचे जलतरण केंद्र होते. या भुयारी मार्गाची रचना पाहून, टिळक रस्त्याच्या दिशेने पाणी वाहून नेण्यासाठी हे वॉटर चॅनेल बांधल्याचे स्पष्ट होते. हे बांधकाम ७ ते ८ दशक जुने असावे, कारण या भुयारात जे पाईप्स आहेत, त्यावर आयएसआयचे मार्क आहेत.
काही वर्षांपूर्वी पुण्यात खोदकामादरम्यान कात्रजच्या तलावातून पुण्यात पाणी आणलेली जलवाहिनी आढळली होती. हा भुयारी मार्ग त्याचाच तर भाग नाही ना, अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत. या संपूर्ण भुयाराचे बांधकाम दगडी आहे. भुयारात खाली दलदल आहे. भुयाराच्या वरच्या भागात आर्च असून ती वाळू आणि चुना यांनी केलेली आहे.