पुणे : नेहमीच्या वेळी शाळेची घंटा वाजली... प्रशस्त गेटमधून मुलांचे लोंढे आत आले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेल्या माजी विद्यार्थ्यांना पाहून नूतन मराठी विद्यालय ( नूमवि ) शाळेच्या दगडी भिंती अक्षरशः गहिवरून गेल्या. राष्ट्रगीताच्या सूरांबरोबर माजी विद्यार्थ्यांसह शाळेचा संपूर्ण परिसर गतकाळातील आठवणींच्या बरसातीत रोमांचित झाला.
एक दिवसाची शाळा : नूतन मराठी विद्यालय शाळेच्या 1997 च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. आम्ही नूतन मराठी विद्यालय समितीचे अध्यक्ष अजय रावेतकर, सचिव मिलिंद शालगर आणि सदस्य अभिषेक पापळ यांच्यासह अनेकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या एक दिवसीय उपक्रमात 1950 ते 2014 सालपर्यंतचे तब्बल 700 ते 800 माजी विद्यार्थी तसेच त्या वेळेचे विद्यार्थी हे सहभागी झाले होते.
1950 ते 2014 सालपर्यंतच्या विद्यर्थ्यांची उपस्थिती : दुपारी 12 ते 3 या वेळेत भरलेल्या या शाळेत नूमविच्या 1950 ते 2013पर्यंतच्या बॅचचे सुमारे 850 ते 900 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले. शाळेच्या माजी आणि आजी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे तास घेतले. राष्ट्रगीत, प्रार्थना, मधली सुट्टी आणि अभ्यासाच्या दोन तासांसह ही एक दिवसाची शाळा माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात घेऊन गेली. गोष्टी सांगणारे शिक्षक अशी ओळख असलेले ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म जोशी यांनी आज माजी विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितली. तर माजी शिक्षक असलेले पं.वसंतराव गाडगीळ यांनी शिक्षक म्हणून काम करतानाच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बोरं, गोळ्या, चिक्या : या आठवणी अधिक संस्मरणीय करण्यासाठी मधल्या सुट्टीत वडापाव, चन्यामन्या, बोरं, गोळ्या, चिक्या, चहा, यांचा आस्वाद देखील सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला. सेल्फी पॉईंट बरोबरच शाळेतल्या आपल्या आवडत्या जागांवर मित्रांसोबत सेल्फी घेतांना सगळ्यांच्याच अंगावर शहारे उमटत होते. जुन्या आठवणींच्या प्रदर्शनाने सगळ्यांचेच डोळे पाणावत होते. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलावंत, शिक्षण क्षेत्रातील गुरूतूल्य व्यक्तीमत्व, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी असे विविध क्षेत्रातील दिग्गज माजी विद्यार्थी या कार्यक्रमात 'केवळ विद्यार्थी' म्हणूनच सहभागी झाल्याने प्रत्येकाच्या मनात जुन्या मैत्रीच्या आठवणींना पाझर फुटत होता. शाळा सुटल्याची घंटा वाजल्यावर पुन्हा पुन्हा असेच भेटायचे असे ठरवून माजी विद्यार्थ्यांनी ''शाळा सुटली, पाटी फुटली'' असं म्हणत एकमेकांना निरोप दिला.
हेही वाचा : Business News : करबचतीसह एफडीवर हमखास परतावा मिळवा, असे करा आर्थिक नियोजन