पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात १० जणांच्या टोळक्याने २० गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. मात्र निगडी पोलिसांनी काही तासातच या टोळक्यातील सर्व लोकांना जेरबंद केले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.
विशाल ठाकूर, ओंकार काटे, राजरत्न सोनटक्के, ऋतिक रुपटक्के, प्रणव कांबळे, अमन पुजारी, हर्षल लोहार, शुभम सोनवणे, प्रज्वल मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी टोळक्यातील दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एका मित्राच्या वाढदिवसावरून आल्यानंतर १० जणांच्या टोळक्याने आकुर्डी परिसरात तब्बल २० गाड्यांची तोडफोड केली. त्यांच्याकडे कोयता, लाकडी दांडके अशी घातक शस्त्रे होती. त्यांनी वाटेत दिसेल ती गाडी फोडली.
दरम्यान, चव्हाण आणि सिद्धार्थ परब नावाच्या व्यक्तीचे दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून हे १० जण आकुर्डी गावठाण येथे चव्हाण याला मारण्यासाठी गेले होते. मात्र तो न मिळाल्याने रागाच्या भरात या आरोपींनी परिसरात दिसेल ती गाडी फोडली. मात्र, अवघ्या काही तासातच निगडी पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक, विलास केकान, साठे, बोडके, घनवट या कर्मचाऱ्यांनी केली आहे.