पुणे - सलग तिसऱ्या दिवशी एनआयएचे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक पुणे पोलीस आयुक्तालयात एल्गार परिषदेसंदर्भातील पुरावे तपासण्याचे काम करत आहे. विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आणि कागदपत्रे 28 फेब्रुवारीला एनआयएच्या कोर्टात सादर करण्यास सांगितले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेले पुरावे आणि कागदपत्रे ताब्यात घेण्याचे काम एनआयएचे एक पथक करत आहेत.
पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या तपासादरम्यान देशातील वेगवेगळ्या शहरात छापे मारून आरोपींना अटक केली. त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, हार्ड डिस्क जप्त केलेले आहेत. सुनावणी दरम्यान पोलिसांनी हे पुरावे म्हणून न्यायालयासमोर मांडले होते. हे सर्व पुरावे तपासून घेण्याचे काम एनआयएच्या पथकाकडून सुरू आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व पुरावे घेऊन एनआयएचे पथक मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - शीना बोरा प्रकरणात माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा देवेन भारतींवर खळबळजनक आरोप
दरम्यान, मागील काही दिवसांपासून एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एल्गार परिषदेचा तपास एनआयएने राज्य पोलीस विभागाकडून काढून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावर टीका केली होती. तसेच राज्यानेही याप्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंगळवारी या प्रकरणावर भाष्य करताना एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा या दोन वेगवेगळ्या घटना असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.