पुणे - कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ असलेल्या एका व्यक्तीचा आपल्या लेकीबद्दल प्रेम व्यक्त करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागेश पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना 2 वर्षाची निहारिका नावाची मुलगी आहे. नागेश हे पिंपरी-चिंचवड येथे खासगी कंपनीत वाहन चालक आहेत. नागेश यांनी आपल्या मुलीचे पाय कुंकवात बुडवून तिच्या पदस्पर्शाने नव्या कोऱ्या कारची पूजा केली होती. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. इतका की, थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीच हा ट्विट केला.
याबद्दल बोलताना नागेश म्हणाले, मी जेव्हा गाडी घेईन, तेव्हा मुलीचा पदस्पर्शाने पूजन करेन असे ठरवले होते. त्याप्रमाणे मी ते केले. मात्र, माझा हा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल, अस वाटले नव्हते. घरात मुलगी हवी ती लक्ष्मी असते. यामुळे तो व्हिडिओ बनवला होता, असेही नागेश यांनी सांगितले. नागेश यांनी 12 दिवसांपूर्वी तो व्हिडिओ टिक-टॉकवर बनवला होता. काही दिवसांमध्ये तो खूप मोठ्या प्रमावर व्हायरल झाला. एवढा की थेट मंत्री अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहचला.
हेही वाचा - बीडमध्ये एसटी बसची मोटार सायकलला धडक, दोन जण जागीच ठार
अशोक चव्हाण यांनी ट्विट करत तो व्हिडिओ पोस्ट केला. चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी नागेश यांना फोन केला. मुलीबद्दलच्या प्रेमासाठी त्यांनी केलेल्या या कृतीचे चव्हाण यांनी कौतुक केले. तसेच दोन वर्षीय निहारिकाची विचारपूसही यावेळी चव्हाण यांनी केली असल्याचे नागेश म्हणाले. टिक-टॉक वर त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केला होता. गर्भात मुलींची हत्या करणे, हे पाप असल्याचे नागेश यांनी म्हटले आहे. तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदित आहे, असेही ते म्हणाले.