पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दिवसभरात १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून अडीचशेचा टप्पा ओलांडून बाधितांची संख्या २५२ वर पोहोचली आहे. तर, चार जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या २५२ तर, १४२ जण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान कोरोनामुळे आत्तापर्यंत शहरातील ७ जणांचा मृत्यू झालेला असून शहराच्या हद्दीबाहेरील ९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू ने अडीचशेचा टप्पा पार केला असून गुरुवारी दिवसभरात १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील बाधितांची संख्या २५२ वर पोहचली आहे. त्यामुळे, शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. तर, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत १४२ जण कोरोनामुक्त झाले असून ते सर्व ठणठणीत झालेले आहेत. तर, ४ कोरोनामुक्त व्यक्तींना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण हे चिंचवड स्टेशन, दिघी, पिंपळे सौदागर, वाल्हेकरवाडी, पिंपरी, मुंबई या परिसरातील आहेत.
गणेशम सोसायटी, पिंपळे सौदागर येथील (गणेशम सोसायटी-गणेशम फेज १-मयुरेश्वर रोड-वाघव्हिला- गणेशम सोसायटी-गणेशम सोसायटी) परिसर गुरुवारी रात्री ११.०० वाजल्यापासून कंन्टेनमेंट झोन घोषीत करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.