पुणे - दक्षिण आफ्रिकेत सी १.२ हा नवीन व्हेरिएंट आला आहे. त्याचबरोबर जगातील चीन, न्यूझीलंड, इंग्लंड अशा देशांमध्ये देखील या विषाणूचे अस्तित्त्व सापडले आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू व्हेरिएन्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून जाहीर केलेला आहे. व्हेरिएन्ट ऑफ कन्सर म्हणून जाहीर केलेला नाही. त्यामुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरलेला नाही. त्यामुळे भारतात चिंता बाळगण्याची कारण नाही, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
कोरोनामध्येही असंख्य व्हेरिएंट -
याप्रकारची जेव्हा जगात साथ येते तेव्हा विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेरिएंट निर्माण होते. कोरोनामध्ये ही अशाच पद्धतीने असंख्य व्हेरिएंट तयार झाले आहे. मात्र, यात चिंतेचं कोणतंही कारण नाही. आज जगात ज्या लसी प्रचलित आहे. त्या सर्व लसी कोणत्याही व्हेरिएंटपासून आपल्याला ६० टक्के सरंक्षण देत असतात. त्यामुळे या लसीमुळे आपल्याला ६० टक्के संरक्षण मिळणार आहे. मात्र, जर असे लक्षात आले की या विषाणूमुळे आपल्याला बाधा जास्त प्रमाणात होत आहे तर मग कदाचित या लसींची पुढची पिढी शोधून काढावी लागणार आहे. जे नवीन व्हेरिएंट आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी नवीन लसीदेखील तयार कराव्या लागतील, असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.
कोरोनाच्या नियमांचं पालन करणे गरजेचं -
सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने म्युटंट कुठलाही असला तरीसुद्धा मास्क, सोशल डिस्टंसिंग, हात स्वच्छ धुणे आणि आपल्याला जर लक्षणे आढळली तर त्वरित तपासणी करून उपचार करून घेणे, याचे पालन करावेच लागणार आहे. त्यामुळे भारतीय लोकांनी वेळेतच सावधान राहायला हवे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून आपण आत्ता कुठेतरी सावरत आहोत. त्यामुळे जर या पद्धतीच्या विषाणूची तिसरी लाट आली आणि आपण सावध राहिलो नाही तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जाव लागणार आहे, असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात 'या' जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण
सी.१.२ व्हेरिएंटकडे अधिक लक्ष देणे आवश्यक -
दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिज (NICD) आणि क्वाजुलु-नेटाल रिसर्च इनोवेशन अँन्ड सीक्वेसिंग प्लॅटफॉर्मच्या संशोधकांनी या वर्षीच्या मेमध्ये देशात पहिल्यांदाच संभाव्य व्हेरिएंट C.1.2 चा शोध लावला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट सी.१.२ ने जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवली आहे. डेल्टापेक्षा जास्त संक्रमण होत असलेल्या या व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वॉन यांनी ट्विट केले आहे की, कोरोनाच्या सी.१.२ व्हेरिएंटकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, अशी माहितीही डॉ. भोंडवे यांनी दिली.