पुणे - मुंबई महापालिकेसाठी मिशन मुंबईची घोषणा भाजपने केली आहे. भाजपने काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र आम्ही तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर आमची ताकद खूप मोठी आहे. भाजपचा प्रभाव कमी होऊ शकतो, हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून समोर आले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्र राहिलो तर भाजपला 30 किंवा 40 फारफार तर पन्नास जागा मिळू शकतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला. पाटील हे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबरला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन
शरद पवारांचा यंदाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. या दिवसानिमित्ताने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन पक्षाकडून करण्यात येणार असून 36 जिल्हे आणि 350 तालुक्यात ही व्हर्च्युअल रॅली पाहता येणार आहे. वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार असून मोजक्या लोकात हा कार्यक्रम होईल, हा कार्यक्रम ऑनलाईन महाराष्ट्रभर दाखवला जाणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते ऑनलाइन या कार्यक्रमात सहभागी होतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान अभियान आयोजित केले जाणार असून जास्तीत-जास्त रक्तदान करून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे देखील जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत
दरम्यान, राजस्थान आणि हैदराबादमध्ये भाजपला मिळालेल्या यशासंदर्भात बोलताना स्थानिक मुद्दे वेगळे असतात, असे सांगत राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचा अंतर्गत काही विषय आहे का? हे पाहावे लागेल, असे पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत कार्यक्रम होत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे मुंबईत असणार आहेत, त्यांना वाढदिवसाचे आमंत्रण देणार का? असा मिश्कील प्रश्न पाटील यांना विचारला असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वाढदिवस साजरा केला जातोय त्यांना काही त्रास होऊ नये, त्यामुळे बोलाविण्यासंदर्भात विचार केलेला नाही, असे गमतीदार उत्तर पाटील यांनी यावेळी दिले.