पुणे : ईडी आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. या कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवला आहे. ते आज चौकशीसाठी गेले आहेत. ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्रास देऊन नाहक बदनामी करण्याचा प्रकार भाजप सरकारने चालवला आहे. त्याच्या निषेधार्थ आज शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली आहे.
नेत्यांना भाजपकडून संपवण्याचा प्रयत्न : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांना शरण न जाण्याचे ठरवले आहे. त्या नेत्यांना भाजपकडून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत पक्षाच्या अनेक नेत्यांना नोटीस आल्या चौकशी झाल्या, पण आम्ही घाबरलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही टिल्ल्या लोकांचा पक्ष नाही. कोणत्याही चौकशीला घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतील असे, नालायक लोक आमच्या पक्षात नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला धमकवण्याचे काम : आज आमचे नेते जयंत पाटील हे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. ते निर्दोष बाहेर येतील, असे यावेळी जगताप म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात या राज्यातील जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल, असे देखील यावेळी ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे म्हणाले की, केंद्रातील तपास यंत्रणा हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला धमकवण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यांनी कितीही धमकवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही घाबरणार नाही, असे यावेळी काकडे म्हणाले.
हेही वाचा :
ED Summons Jayant Patil: ईडीने बजावले जयंत पाटील यांना दुसरे समन्स; 29 मे रोजी होणार चौकशी
Jayant Patil ED probe: हजर राहण्याकरिता १० दिवसांची मुदत द्या-जयंत पाटील यांची ईडीला विनंती