बारामती (पुणे) - सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत विषमुक्त सेंद्रिय शेती उत्पादनात सातत्य ठेवले तर सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता येईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 'गोविंदबाग' या पवार यांच्या निवासस्थानी नुकतेच सेंद्रिय शेती उत्पादनाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत माजी केंद्रीय कृषीमंत्री यांनी सेंद्रीय शेतीबद्दल मत व्यक्त केले आहे.
राज्याचे कृषिमंत्री पणनमंत्री व सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यांमध्ये मोर्फा या सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शरद पवार म्हणाले की, सेंद्रिय शेतीपुढे सध्या अनेक समस्या आहेत. पण संघटीतपणे सेंद्रिय शेती उत्पादनाचा एकच ब्रँड बनविल्यास 'शेतकरी ते ग्राहक साखळी' मजबूत होऊन दोघांचाही फायदा होईल. अनेक निर्यातदार व स्थानिक सुपर मार्केटचे प्रतिनिधी सर्व सेंद्रिय उत्पादने घेण्यास उत्सुक आहेत. पण गुणवत्तापूर्ण विषमुक्त मालाची हमी व सातत्याने पुरवठा ही त्यांची अट आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण काम करुन मार्केटची सेंद्रिय उत्पादनाची गरज पूर्ण करावी, असा पवार यांनी सल्ला दिला आहे.
काय आहेत सेंद्रिय शेती उत्पादन व मार्केटिंग संबंधित अडचणी?
१) राज्यभरात विखुरलेले असंघटित सेंद्रिय शेती करणारे उत्पादक व शेतकरी कंपन्यांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव आहे.२) प्रमाणिकरण करण्यासाठी सरकारची सक्षम यंत्रणा व कार्यपद्धती नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांनी सेंद्रिय प्रमाणिकरणासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभी केली आहे. महाराष्ट्र राज्यानेही तशी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मोर्फा या सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेची मागणी आहे. ३) शेतमाल वाहतुक व दळणवळणाच्या मर्यादित सुविधा आहेत, त्या सरकारने वाढवाव्यात, अशी मोर्फाची अपेक्षा आहे. ४) व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव तसेच जाहिरातीमध्ये सेंद्रीय शेतीचे उत्पादने मागे आहेत. ५) शेती उत्पादनात वैविध्य परंतु मागणीनुरुप पुरवठ्यास मर्यादा आहेत. ६) सातत्याने पुरवठा करण्याची शाश्वती नसल्यामुळे निर्यातदार जोडले जात नाहीत. त्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेची अपेक्षा आहे. ७) सेंद्रिय माल साठवणूक तंत्र सरकारने ऊपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकणार आहे. शीतसाखळीच्या मर्यादा असल्याने सरकारी स्तरावर त्या वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेने म्हटले आहे. ८) शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादनाला मर्यादा येत आहेत.
महाराष्ट्र राज्याची सेंद्रिय शेतीत अशी आहे स्थिती-
१) राज्यातील ६५ हजार शेतकरी ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर थर्ड पार्टी सर्टिफिकेशन करून सेंद्रिय शेती करतात.२) कृषी विभागाच्या 'आत्मा'मधून ४० हजार शेतकरी २० हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करतात.३) राज्यातील एक लाखापेक्षा जास्त हेक्टरवर शेतकरी विषमुक्त शेती करतात.
सेंद्रिय शेती उत्पादक संस्थेबाबतच्या बैठकीला सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी प्रतिनिधी शिवरूपराजे खर्डेकर, प्रगतशील शेतकरी व मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, तुषार कारले, सुनील ढवळे उपस्थित होते. त्याचबरोबर अतुल कारले, समीर दुगणे, निलेश पांडे, राजेंद्र वरे, अमरजित जगताप, डॉ. गोवर्धन भुतेकर, डॉ.संदिप वाघ, डॉ. दीपक बहीर, गणेश पारेकर, विजय शितोळे व रोहित अहिवळे आदी उपस्थित होते.