पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्यांच्या निवृतीच्या निर्णयामुळे एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता शरद पवार हे कुठलाही निर्णय घेतात त्याच्यामागे बरेच कारणे असतात. सगळ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांच्या प्रेमापोटी आणि विनंतीला मान देऊन शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेतला. हा निर्णय भावनिक होता, त्यामुळे याच्यामागे कुठलीही राजकीय रणनीती होती, असे आम्हाला तरी वाटत नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्यासोबत नागरिक : मी एकटाच सावली सारखा त्यांच्यासोबत होतो, असे नाही. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनीच सगळी माहिती सांगितली आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या इच्छेनुसार त्यांनी माघार घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता कार्यकर्त्यांना घेऊन लढायचे आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. नेहमीच त्यांच्या विचाराने चालणारी लोक आहोत. प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज शरद पवार यांच्याबरोबर आहेत. पुण्यामध्ये सुद्धा शरद पवार यांचे अतिशय प्रेमाने सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. हीच खरी शरद पवार यांची ताकद असल्याचे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीत शरद पवारांना पर्याय नाही : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांना पर्याय नाही, अशी चर्चा सुरू होती. यावर रोहीत पवार यांना विचारला असता, ते म्हणाले की असे नाही काही. लोकांनी लिहिले, व्हाट्सअप केले आहे. काही जण उगाच चर्चा करत आहेत. आपण जर पाहिले तर कमिटीमध्ये सर्वच लोक होते. कमिटीमध्ये एका आवाजामध्ये एका निर्णयाने शरद पवार यांनी माघार घ्यावी असा निर्णय झाला आहे. त्यामुळे अश्या अफवांवर खूप विश्वास ठेवून हे योग्य नाही, असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.
अजित पवार नाराज नाहीत : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज शरद पवारांबरोबर पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की अस काही नाही. कमिटीमध्ये अजित पवार होते. सिल्व्हर ओकमध्ये अजित पवार आले होते आणि त्यांनी देखील शरद पवार यांच्याशी चर्चा केली. तिथे असे ठरले होते की ठराविक लोकच हे पत्रकार परिषदेला जातील. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा योग्य नसल्याचे यावेळी रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे काही नेते जाणार भाजपसोबत : राष्ट्रवादी काँगेसचे काही नेते भाजप बरोबर जाण्याची चर्चा आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की असे नाही. त्या फक्त चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या फुटलेल्या गटाच्या विरोधात जनमत आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधातही नागरिकांमध्ये असंतोष आहे. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये प्रथमच एखादा पक्ष फोडून सत्तेत येण्याचे राजकारण झाले आहे. त्यामुळे भाजपलाच असुरक्षित वाटत आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला कुठेतरी पराजय स्वीकारावा लागल्याच्या भीतीने नेते आपल्याकडे आले तर बरे होईल. त्यामुळे त्यांनीच कदाचित राजकीय पुडी सोडली असावी, असेदेखील रोहित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार येणार मतदार संघात : अजित पवार हे तुमच्या मतदार संघात येणार आहेत. याबाबत रोहीत पवार यांना विचारले असता त्यांनी अजित पवार माझ्या मतदारसंघांमध्ये येत जात असतात. माझ्या मतदारसंघांमध्ये अनेक कार्यक्रम असतात. तसेच तुम्ही जर बघितले तर बऱ्याच ठिकाणी अजित पवार हे स्वतःहून तिथे जात असतात. त्यामुळे अजित पवार हे शेवटी विरोधी पक्ष नेते आहेत. आमचे नेते आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ते कधीही जाऊ शकतात, असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.
नारायण राणेंविषयी आहे आदर : नारायण राणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. याबाबत रोहीत पवार यांना विचारले असता, नारायण राणे यांच्याबाबत माझ्या मनात आदर आहे. जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा भाजपबद्दल आणि भाजपच्या विचारसरणी बद्दल यांची काही मते होती. मग भाजपमध्ये गेल्यावर त्यांचे मत बदलले आहे. अश्या पद्धतीने जर मत बदलत असेल तर लोकांचा विश्वास देखील कमी होऊ शकतो, असे देखील रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांनी माघार घेतलीच पाहिजे : आज कमिटीच्या बैठकीबाबत विचारले असता, रोहीत पवार यांनी बैठकीमध्ये काय चर्चाही झाली नाही, पण बैठक जेव्हा होत असते तेव्हा चर्चा तर होणारच. लोकशाही पद्धतीने सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार तिथे असल्यामुळे विविध लोकांनी विविध विषय तिथे मांडली. महत्त्वाची गोष्ट आहे की एका मुखाने एका मताने शरद पवार यांनी माघार घेतलीच पाहिजे हा निर्णय घेतला. तो निर्णय नंतर शरद पवार यांनी सुद्धा लोकांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या हट्टापायी आणि या महाराष्ट्राला योग्य असल्याने मागे घेतल्याचे यावेळी रोहित पवार म्हणाले.
संजय राऊतांवर टाळले रोहीत पवारांनी बोलणे : संजय राऊत नेहमी बोलतात, त्याबाबत रोहीत पवार यांना विचारले. मात्र तो त्यांचा विषय आहे आणि कसे अनेक लोक दररोज काही ना काही तरी बोलत असतात. मात्र ते बोलल्यानंतर आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत गेलो आणि उत्तराला उत्तर दिले तर लोकांचा वेळ यामध्ये जाऊ शकतो. आज महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत, अनेक अडचणी आहेत, त्या कशा आपल्याला सोडवता येतील हे पाहावे असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.
बारामती अग्रोवन कारखान्याला दंड : भाजप आमदाराच्या तक्रारीवरून बारामती अग्रोवन कारखान्याला दंड ठोठावण्यात आला आहे. यावर रोहीत पवारांना विचारले असता, तो दंड दोन महिन्यापूर्वी झाला होता. जेव्हा तो दंड झाला असेल तेव्हा त्या व्यक्तीने ती कारवाई करा असे रडून रडून सांगितले. तेव्हा त्यांनी पार्टी सुद्धा केली असणार. पवारांवर कारवाई झाली आणि काल टीव्हीवर आल्यानंतर अजून एकदा पार्टी केली असेल. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, विकासामध्ये त्यांना काही पडले नाही. त्यामुळे त्यांना आनंद मिळत असल्याचे यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.
प्रणिती शिंदेंची सभा उधळल्यावर काय म्हणाले रोहीत पवार : बेळगांवमध्ये प्रणिती शिंदे यांची सभा होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने ही सभा उधळून लावली आहे. यावर पवार यांना विचारले असता, सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार उभे आहेत. तिथे जाऊन प्रचार केला तर त्यांच्या बाजूनेच केला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला आहे. नाहीतर प्रचार करायचा नसेल तर जाणे योग्य नव्हते. काँग्रेस पार्टीचे उमेदवार असल्यामुळे कदाचित त्या तिथे गेल्या असाव्यात. देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या गोष्टीला समोर जावे लागले. मराठी अस्मितेच्या बाबतीत लोक भावनिक आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात जाऊन कोणी भाषण करत असेल, तर त्याचा विरोध होणार. त्यामुळे मी सुद्धा विनंती केली होती, महाराष्ट्रातले जे काही नेते तिथे जाऊन त्यांच्या बाजूने बोलत असतील, तर जावे नाहीतर न गेलेले बरे असेही यावेळी रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -
3 Worker Died In Fire : मंडपाच्या गोडावूनला लागलेल्या भीषण आगीत तीन कामगार जळून खाक, आगीत चार सिलेंडर फुटलेUddhav Thackeray Visit To Barsu: शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत - उद्धव ठाकरेंचा निशाणाShirdi Police raided six hotels : शिर्डीतील सहा हॉटेलवर छापा, 15 पीडित मुलींची सुटका तर 11 पुरुषांना घेतले ताब्यात |