पुणे - आर्यन खान प्रकरणात मी एक आई म्हणून याचं उत्तर देईल की कुठल्याही आईसाठी हा खूप दुःखाचा विषय आहे. कुठल्याही कुटुंबासाठी हे झालं असेल तर ते दुर्दैवी आहे. जी काही माहिती मिळत आहे की, आर्यन खानकडे काहीच सापडलं नाही. तस जर काही असेल आणि एखादा मुलगा निर्दोष असेल, त्याला 26 दिवस न्यायालयीन कोठडी करत असतील तर हा कुठला न्याय आहे? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. जर त्याने तो गुन्हा केला नसेल तर याचा उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे. 26 दिवसानंतर असे कळते आहे की, की त्याच्याजवळ काहीच सापडलं नाही तर मग 26 दिवस काय केले? असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला आहे.
एका अधिकाऱ्यामुळे महाराष्ट्राची आणि भारताची प्रतिमा इंटरनॅशनल खराब -
ड्रग्स तर खूप मोठी गोष्ट आहे. मी तर तंबाखूच्या विरोधात आंदोलन करत असते. अशा सर्व अंमली पदार्थातुन समाजात मुलांचे पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यांना तुरुंगवास देणे नाही. त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. मात्र, काही अधिकारी अशी काही भाष्य करतात आणि कोणाच्याही मुलांवर अन्याय होत असेल तर हे महाराष्ट्र आणि देशासाठी हे योग्य नाही. बॉलिवूड हे इंटरनॅशनल आहे. भारताची आणि महाराष्ट्राची ओळख ही जगामध्ये बॉलिवूडबाबत विचारत असतात. त्यामुळे अशा जेव्हा चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा महाराष्ट्राचे नाव खराब होतेच. मात्र, त्याचबरोबर देशाचेही नाव खराब होते. त्यामुळे ड्रग्सच्या विरोधात आपण सर्वांनी आंदोलन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
आघाडीबाबत तिन्ही नेते निर्णय घेणार -
आघाडीबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे घेणार आहेत. अनेक लोक अशी आहेत की, ज्यांनी 5 वर्षात काहीही काम केलेले नाही. सिग्नलमध्येच 58 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.
केंद्राने 8 दिवसासाठी 50 टक्के डिस्काउंट दिलं पाहिजे -
इंधन नव्हे तर सिलेंडरचेदेखील भाव हे वाढले आहे. भाववाढ विरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र भावना आहे. आज महिला मला सांगत आहे की, तुम्ही दिल्लीला जा आणि मोदी साहेबाना सांगा की सिलेंडरचे भाव कमी करा. सिलेंडरच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हा खूपच अडचणीत आला आहे. सणांचे दिवस आहे. मला केंद्र सरकारला विनंती करायची आहे की, सणांच्या दिवशी तरी 50 टक्के डिस्काउंट द्यायला पाहिजे. केंद्राने आठ दिवसांसाठी 1000 रुपयांचा सिलेंडर 500 रुपये करावं, असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या.
...तर हे खूप दुर्दैवी -
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने असे म्हटले होते की, साम, दाम, दंड, भेद करून कोणालाही घेऊ ही लढाई तत्त्वाची नसून सत्तेसाठी आहे, हे दुर्दैवी आहे. अटलजींच्या काळात भाजप हा खूप जबाबदार पक्ष होता. खूप आशेने आणि अपेक्षेने लोक त्यांच्याकडे बघत होते. एरवी जे आम्हाला तत्त्वज्ञान देत होते. तेच जर आज गुंडांबरोबर असेल तर हे खूप दुर्दैवी आहे, असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या.
ईडीने तर छापा टाकण्याचा विक्रम केला -
पवार साहेब मागच्या आठवड्यात म्हणाले ती गोष्ट खरी आहे, की ईडीने तर छापा टाकण्याचा विक्रम केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी 7 वेळा छापे टाकण्यात आले. एकाच घरात 7 वेळा छापे टाकायचा विक्रम या केंद्र सरकारने केला.
5 वर्षात 5 विकास काम दाखवा आणि 5 हजार जिंका -
आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी अस सांगितले आहे की ताई तुम्हीच स्वतः बघा की पुणे शहरात आज भाजपची जी सत्ता आहे. या 5 वर्षात काय काम झाली आहे. हे दुर्दैवी आहे की ज्या वेगाने विकास व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. 5 वर्षात 5 विकास काम दाखवा आणि 5 हजार जिंका, असे आमचे अध्यक्ष म्हणाले आहे, असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या.