पुणे - काँग्रेससोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली. पर्यायी सरकार निर्माण करण्याच्या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे मलिक म्हणाले. उद्या (सोमवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे मलिक म्हणाले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाली. लवकरात लवकर राज्यातील राष्ट्रपती राजपट संपवून पर्यायी सरकार स्थापन करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे मलिक म्हणाले. सोमवारी शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे नेते यांच्यात बैठक होऊन पुढील निर्णय होणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, गटनेते अजित पवार, आमदार धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ उपस्थित होते.