पुणे - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्यावर निशाणा साधला. त्यावर अजित पवार यांनी खुलासा करत सोशल मीडियाचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात आहे. तेवढाच व्हिडिओ व्हायरल करत, 'बघा शरद पवार हे कसं करतात', असे सांगितले जात आहे. शरद पवार यांना जनता अनेक वर्षांपासून ओळखते ते असलं काही करत नाहीत. एकवेळ अजित पवारांनी केले असते तर, हो ते आहेत तसे असे म्हणता आले असते, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा - भाजपला काही विचारा, उत्तर एकच 370; शरद पवारांचा भाजपला टोला
अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युती सरकारवर त्यांनी जोरदार टीका देखील केली. पिंपरी-चिंचवड शहरातील जनता १९८४ पासून साहेबांना ओळखते, असले व्हिडिओ फिरवून-फिरवून दाखवले जातात. काखेतून कुठे पुढे येतो, असे म्हणत त्यांनी त्या कार्यकर्त्यांला बाजूला केले असावे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न
५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे. हे सरकार पोटावर लाथ मारणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय दिवे लावले, काय प्रश्न सोडवले? असा सवाल अजित पवार यांनी केला. राज्यात अस्वस्थता वाढली असून प्रचंड बेकारी वाढली आहे. विरोधक नसते तर देशाच्या पंतप्रधानांना सभेच्या निमित्ताने राज्यात यावे लागले नसते. एका रुपयात आरोग्य तपासणी या शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील योजनेची खिल्ली उडवत एक रुपयात चहा देखील येत नाही, असे ते म्हणाले.