पुणे - आपल्याला आता आधुनिकतेची कास धरावी लागणार आहे. महाराष्ट्र एकेकाळी साखर क्षेत्रात क्रमांक एकला होता, आज उत्तर प्रदेश क्रमांक एकवर आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण जसे काम करतो तसेच काम संस्थेच्या शाखांमध्ये आपल्याला करावे लागेल, असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार ट्विटद्वारे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले आहे. ते दिलेला शब्द पाळणार याचा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री महोदयांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून, शेतकरी वर्ग, साखर कारखानदार व अधिकार्यांना मार्गदर्शन केले याबद्दल संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्टीत 'यू टर्न' मारतात - चंद्रकांत पाटील
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४३ वी सर्वसाधारण वार्षिक सभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल ठाकरेंना पुरस्काराने गौरविण्यात आले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संशोधन व कार्याचा विस्तार मराठवाड्यासारख्या भागात व्हावा, विदर्भात व्हावा याकरता त्या भागांमध्ये जमीन उपलब्ध व्हावी म्हणून संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जालना जिल्ह्यातील जमीन प्रदान प्रकरणी त्यांनी लक्ष द्यावे. साखर उद्योगातील दोन संस्था अर्थात राज्यातील साखर संघ व देशपातळीवरील नॅशनल शुगर फेडरेशन यांना माझी विनंती राहील की, साखर कारखान्यांच्या समस्येवर उपाय योजना शोधण्यासाठी नाबार्ड, राज्य शासन, केंद्र शासनातील अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन एखाद्या बैठकीचे आयोजन व्हावे.
हेही वाचा - 'कमी आमदार असतानाही भाजपवर मात'
अडचणीतील कारखान्यांसमोर थकित कर्जाचा मोठा प्रश्न आहे. पूरपरिस्थितीमुळे, अवर्षणामुळे साखर कारखानदारीवर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. कर्जाची पुनर्रचना करणे, सॉफ्ट लोन उपलब्ध करून देणे वगैरे बाबींचा विचार करण्यासाठी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की, याबाबत तातडीने बैठक बोलवावी.
येत्या ३१ जानेवारी २०२० रोजी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आपण घेत आहोत, ज्यामध्ये २२ देशातील साखर क्षेत्रातील जाणकार भाग घेणार आहेत. संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी अधिकाधिक लोक या परिषदेत येतील याची काळजी घ्यावी जेणेकरून जगात काय सुरू आहे याची कल्पना इतर सभासदांना येईल. ऊसासंबंधित प्रक्रिया व संशोधन करणार्या जगातील संस्थांचे आपण सभासद आहोत. जगात ज्या काही नवीन गोष्टी घडतात, त्या इथे आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो. देशातील इतर राज्यांत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो.
सहकार व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या लोकांनी ही संस्था स्थापन केली. स्व. वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील, शंकरराव कोल्हे, यशवंतराव मोहिते आणि इतर सर्व प्रमुख लोकांच्या नावाचा उल्लेख इथे करावा लागेल. या सर्व लोकांनी दूरदृष्टी ठेवत या संस्थेची स्थापना केली होती.