पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला. याविषयीही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. चित्रा वाघ या मला सांगून गेल्याचे पवार म्हणाले.
चित्रा वाघ यांच्या पतीवर कारवाई केली. तसेच त्यांच्या पतीच्या काही संस्थांवर एसीबीची कारवाई करण्यात येऊन त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे वाघ यांनी मला पक्षांतराची परवानगी मागितली असल्याचे पवारांनी सांगितले, अशा प्रकारे भाजपकडून सत्तेचा गैर वापर केला जात आहे.
शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घटनांवर भाष्य केले. आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले होते. त्यांनी पक्ष सोडून जाणार नसल्याचे सांगितले आहे. तर श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि अहमनगरचे आमदार संग्राम जगताप यांचेसुद्धा फोन आले होते. तेसुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याने ते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हसन मुश्रीफ यांना भाजपात येण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु, त्यांनी नकार देताच प्राप्तिकर विभागामार्फत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. सत्ताधारी भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत आहे, असे पवार म्हणाले.