पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीतून एका नक्षलवादी तरुणाला सोमवारी दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. नक्षलवादी तरुणावर झारखंड दुमका येथील कुंड पोलीस ठाण्यात भा.द.वि च्या विविध कलमान्वये व शस्त्र कायदा व इतर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साहेब राम हंसदा उर्फ आकाश मुर्म, असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
साहेब राम हंसदा हा चाकण आळंदी फाटा येथील श्री प्रेसिंग कंपनीत काम करतो. त्याला झारखंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर झारखंड राज्यात १ लाख रुपये इनाम ठेवण्यात आला होता. २०१३ साली दुमका जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमरजित बलियार यांच्यावर नक्षली हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले होते. या नक्षली हल्ल्यामागे साहेबराम हंसदा उर्फ आकाश मुर्म हा मुख्य आरोपी असल्याचे घोषीत करण्यात आले होते. साहेबराम हा चाकण येथील श्री प्रेसिंग कंपनीमध्ये १५ दिवसापूर्वीच कामाला लागलेला होता. त्याच्या मागावर असणाऱ्या झारखंड पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे घेतले दर्शन
सध्या पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे, असे असताना दहशतवादी कारवाया करणारे तरुण याच परिसरात रोजगाराच्या माध्यमातून वास्तव्य करत आहे. त्यामुळे या परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा- 'राफेलची पूजा केली तर काय चुकलं?, हा आमच्या श्रद्धेचा भाग'