पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएच्या 140 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. 28 मे रोजी पुण्यातील एनडीएच्या हबीबुल्ला हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भारतीय संरक्षण दलात अधिकारीपदावर जाण्यासाठी एनडीएच्या तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे असते. त्यानुसार हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह दरवर्षी होणारा एक आगळा वेगळा सोहळा असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी परंपरेनुसार कार्यक्रम केला जातो.
डी. बी. शेकटकर प्रमुख पाहुणे
यंदा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम विद्यापीठाचे कुलपती लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून 215 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेतून 48, संगणक शाखेतून 93 आणि कला शाखेतून 74 जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
मित्र देशांचे 18 जण
यंदाच्या तुकडीत मित्र देशांच्या 18 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या व्यतिरिक्त, 44 नेव्हल आणि 52 एअर फोर्स विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या बीटेक शाखेच्या विद्यार्थ्यांनाही यावेळी 'तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण' केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यंदाच्या तुकडीत सीओएएस रोलिंग ट्रॉफी आर. सैनी याने पटकावली. तो विज्ञान शाखेत प्रथम आला. जे. ताम्रकर हा संगणक शाखेतून पहिला आला. त्याला कमांडंटचे रौप्य पदक आणि अॅडमिरलची रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तर व्ही. कुमार हा सोशल सायन्स शाखेतून पहिला आला. त्याला देखील कमांडंटचे रौप्य पदक तसेच सीएएस करंडक प्रदान करण्यात आला. एनडीएच्या 6 सेमीस्टर प्रशिक्षणात बीटेक शाखेतून व्ही. उपाध्याय प्रथम आला.
आज दीक्षांत संचलन
आज (29 मे) सकाळी या तुकडीच्या दीक्षांत संचलनाचा सोहळा एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे.
हेही वाचा - नऊ दिवसांत खूप काही होऊ शकते, मार्ग निघेल; अजित पवारांची प्रतिक्रिया