पुणे : आज सकाळी धंगेकर यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत पवार यांनी, ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही संधीचे सोने करण्याची हीच वेळ आहे. माझ्या पूर्ण शुभेच्छा आहे. असे यावेळी धंगेकर यांना सांगितले आहे. कसबा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भारतीय जनता पक्षातील सर्वच नेते मंडळींनी पुण्यात ठाण मांडले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न देखील केले जात आहे.
धंगेकर यांनी पवारांची घेतली भेट : गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना मैदानात उतरवण्यात आले आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील जोर लावला आहे. महाविकास आघाडीचे नेतेमंडळी प्रचारासाठी येत आहे. अश्यातच धंगेकर यांनी पवार यांची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाल्याची दिसून येत आहे. भाजपकडून हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आमने सामने आहेत.
स्थानिकांचे प्रश्न : गेल्या 30 वर्षापासून मी कसबा मतदारसंघात काम करत आहे. कसबा मतदार संघाची कामे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. या मतदारसंघात पूर्वी 3 लाख मतदार होते. आत्ता अडीच लाख मतदार राहिले आहेत. जे मतदार होते ते इथे कामे न झाल्यामुळे स्थलांतरित झाले आहेत. मला त्या लोकांना इथे परत आणायचे आहे. या मतदारसंघातील वाहतूक कोंडी, जुने वाडे तसेच स्थानिक लोकांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहे. ते मी येणाऱ्या काळात सोडवणार आहे, असे देखील रवींद्र धंगेकर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले होते.
अपक्ष उमेदवारांकडून अर्ज : कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांकडूनदेखील उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने हे चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच 3 वेळा नगरसेवक राहिले आहेत. तरीही, ते एका चौकटीच्या पुढे कधीही गेले नाही. ते ज्या पद्धतीने सांगत आहे की मी एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. तर येथे शहरात राजकीय जीवनात काम करणारा प्रत्येक जण हा गणेश मंडळाचा कार्यकर्ता असतो, अशी टिका देखील रवींद्र धंगेकर यांनी केली होती.