पुणे - पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची आज बहुमताने निवड करण्यात आली. तर, उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी जेष्ठ नगरसेवक प्रकाश कदम यांना संधी देण्यात आली होती.
या निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना 97 मते तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ होते तर, 5 नगरसेवक अनुपस्थित होते. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक असून त्यांचे 2 नगरसेवक आज अनुपस्थित होते. मोहोळ यांची निवड झाल्यानंतर खासदार गिरीश बापट आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले हे उपस्थित होते. मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी यावेळी नवनिर्वाचित महापौर मोहोळ यांचे औक्षण केले. महापालिका परिसरात ढोल - ताशांच्या आवाजात निवडीचे स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी मोहोळ यांच्या निवडीचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आले होते.
हेही वाचा - मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उप महापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड
भाजप नगरसेवकांनी भगवे फेटे घालून भाजपचे चिन्ह असलेले उपरने गळ्यात घातले होते. आरपीआय (आठवले गट) च्या नगरसेवकांनी फेटा आणि गळ्यात रामदास आठवले यांचे चित्र असलेले उपरने घातले होते. तुतारी वाजवून नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर होते. महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला शिवसेनेने साथ दिल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. राज्यातील सत्ता स्थापनेच्या निर्णयाआधीच पुण्यात महाविकास आघाडी स्थापन झाली आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये शिवसेनेचा शो 'फ्लॉप'; भाजपचे सतीश कुलकर्णींची महापौर