पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरात प्रेमप्रकरणातून मुलीच्या घरच्यांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
विराज विलास जगताप (वय 20 वर्षे), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत जितेश वसंत जगताप (वय 44) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 7 जून) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी जितेश जगताप यांना फोन केला आणि 'विराजला आम्ही पिंपळे सौदागर येथे मारले आहे, येथून घेऊन जा,' असे सांगितले. तेव्हा जितेश, विराजची आई आणि इतर काही जण घटनास्थळी पोहोचले. विराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तक्रारदार जितेश हे विराजच्या जवळ गेले. अगदी शेवटच्या घटका मोजत असलेल्या विराजने सर्व प्रकार सांगितला.
विराजने सांगितले की, मुलीचे वडील, भाऊ हे छोट्या टेम्पोने भरधाव वेगात आले आणि त्यांनी माझ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. मी खाली पडलो. मी पळून जायचा प्रयत्न केला. मात्र, धावताना मी खाली पडताच आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगडाने माझ्यावर हल्ला केला. 'माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी आहे का तुझी, मुलीवर प्रेम करतो का?' असे म्हणून माझ्या अंगावर थुंकले, असे जितेशने तक्रारीत म्हटले आहे.
विराजला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, सोमवारी (दि.8 जून) दुपारी उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा - 'होम क्वारंटाईन'चा शिक्का असताना गेला कामाला; दाखल झाला गुन्हा..