पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील टेमघर, वरसगांव, पानशेत आणि खडकवासला ही धरणक्षेत्रे 100 टक्के भरल्याने या चारही धरणक्षेत्रातुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रातील भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
म्हणून बंद करण्यात आला भिडे पूल -
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. पुणे महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी फिरते हौद जरी केले गेले असले तरी काही नागरिकांच्यावतीने मुळा-मुठा नदीत म्हणजेच वाहत्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. धरणक्षेत्र 100 टक्के भरले असल्याने मुळा-मुठा नदीत सुरू असलेले 11 हजार 941 क्युसेक आता कमी करून 9421 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून, नदी पात्रातील भिडे पूल बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले
खडकवासला धरणक्षेत्रातील चारही धरण 100 टक्के भरले -
शहराला हंगामात प्रथमच 22 जुलैला खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. त्यानंतर पानशेत धरण 3 ऑगस्ट तर वरसगाव धरण 19 ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले. खडकवासला धरण साखळीमधील टेमघर धरण 13 सप्टेंबरला भरून चारही धरणांमधील पाणी साठा 29.15 घनफूट (टीएमसी) म्हणजे शंभर टक्के झाला आहे.