पुणे - जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे पाच जणांनी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला (वायरमन) राहत्या घरात घुसून जबर मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वायरमन लखीचंद राठोड यांनी सोमवारी (काल) मारहाण करणाऱ्यांना थकीत लाइट बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करावे लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर सर्विस वायर व लाइट बिल भरण्याच्या रागातून प्रताप कातोरे, अमोल कातोरे, हर्षद धुमाळ, श्यामराव धुमाळ यांनी राठोड यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना जबर मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या मारहाणीत राठोड यांना गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर तीन जणांना अटक केली असून उर्वरित दोन मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा -शंभर कोटी वसुली प्रकरणी चांदीवाल यांच्यासमोर सचिन वाझेची नोंदवली साक्ष