पुणे - राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते भयानक आहे. केंद्राची मदत जाहीर होईल. तोपर्यंत ओला दुष्काळ तरी जाहीर करा, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केले आहे.
या आपत्तीबाबत राजकारण न करता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 'राज्य सरकारने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने निधी दिला पाहिजे. जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत केंद्रीय पथक पाहणी करण्यास येणार नाही. आज जर तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर, पुढील रब्बीचे पीक शेतकरी कसे घेणार, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. याकरता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. तसेच, विमा कंपन्या जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरतात. अशा कंपन्यावर कारवाई केली पाहिजे.
राज्यात अतिपावसामुळे शेतकऱ्यांची महाभयानक परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पूरग्रस्त भागाचा दौरा केला,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे योगदान मोठे - पी. शिवशंकर
'शेतकरी जगला पाहिजे, सरकारने माझं-तुझं करण्यापेक्षा, केंद्राची जबाबदारी - राज्याची जबाबदारी असे करण्यापेक्षा राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. प्रसंगी शेतकऱ्यांना कर्ज घेऊन मदत करा. आज मदत केली नाही तर, पुढे रब्बी पिकासाठी शेतकरी काय तयारी करतील? दुसरीकडे विमा कंपन्यांनी खेळ मांडला आहे. शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होते आहे. विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटी तत्काळ शिथिल केल्या पाहिजेत,' असे संभाजीराजे म्हणाले.
आपण शेतकऱ्यांसाठी केंद्रात प्रयत्न करायला तयार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. राज्य सरकारने जबाबदारी घ्यावी, मी शेतकऱ्यांसाठी दिल्लीत बसून राहीन, असेही ते म्हणाले. तसेच, केंद्राची मदत मिळेपर्यंत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा - भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे, जाणून घ्या या मागे काय असेल कारण...