पुणे : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गिरीश बापट यांच्यामागे मुलगा बायको, सून आणि नात असा परिवार आहे. गिरीश बापट यांचा अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. गिरीश बापट हे 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. गिरीश बापट हे पुण्याचे खासदार म्हणून काम करत होते. बापट हे जरी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून शहरात काम करत असले तरी सर्वच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी खास दोस्ती असलेले बापट हे संपूर्ण पुणेकरांना चांगलेच ओळखत होते. राजकारणात कोणीच शत्रू नसून सर्वच आपले मित्र आहेत अशा पद्धतीचे राजकारण खासदार गिरीश गिरीश बापट यांनी केले आहे.
वैकुंठ स्मशनभूमीत अंत्यसंस्कार : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्या दीड वर्षपासून ते आजाराशी झुंज देत होते.आज अखेर त्यांची झुंज संपली. पुण्यातील वैकुंठ स्मशनभूमीत सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरासह राज्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी हे देखील उपस्थित राहणार आहेत.
ऑक्सिजन लावून प्रचार केला : गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट यांना श्वसनाच्या आजार झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. नुकतेच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत ऑक्सिजन लावून प्रचार तसेच मतदान केले होते. दोन दिवसांपूर्वी बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
आजारी असताना नेत्यांनी घेतली भेट : कसबा पोट निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील सर्वच नेते मंडळींनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस देखील केली होती. गिरीश बापट आजारी असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या नेत्यांनीही भेट घेतली होती व प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेमुळे भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक : खासदार गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे झाला. पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर बापट यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत असणाऱ्या बापट यांनी बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर त्यांनी 1973 मध्ये पिंपरी चिंचवड येथील टेल्कोमध्ये कामगार म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय जीवनाला सुरूवात झाली.
राजकीय जीवनाला सुरूवात : खासदार गिरीश बापट यांनी आणीबाणीच्या काळात 19 महिन्यांची शिक्षा भोगून आल्यावर त्यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. लहान पणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघात विविध पदानंतर 1983 साली त्यांनी निवडणूक लढविण्याचा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीनवेळा त्यांनी नगरसेवकपद हे राखले. त्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार 1995 मध्ये त्यांनी पुण्याच्या कसबा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढविली आणि ती चांगल्या जनसंपर्कामुळे जिंकली देखील. त्यानंतर सलग पाचवेळा ते याच मतदार संघातून निवडून आले. त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विविध उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली पण कधीही त्यांना शत्रू मानले किंवा त्यांच्या विरोधात बोलले नाहीत. निवडणूक झाली की त्याचे विरोधातील उमेदवाराबरोबर चहापान तसेच हसत मिळत राहत होते. हेच त्यांच्या या राजकारणाच वैशिष्ट्य होते.
2019 साली झाले खासदार : 1996 साली भारतीय जनता पक्षाने गिरीश बापट यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ही निवडणूक तेव्हा खूपच अटीतटीची झाली होती आणि या निवडणुकीत बापट यांचा पराभव झाला. काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे खासदार झाले. पराभव झाला असला तरी बापट यांचे मतदार संघात, शहरात काम सुरू होते. 2014 मध्ये देखील गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची असताना देखील पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली होती. पक्षाचे आदेश हे अंतिम आदेश मानून त्यांनी 2014 साली पक्षाचे काम केले आणि शेवटी 2019 मध्ये मोर्चेबांधणी करत खासदारकीचे तिकीट मिळवले आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांचा 96 हजार मतांनी पराभव केला.
पुण्याचे भाऊ हरपले : पुणे शहराच्या राजकारणात तसेच खासदार गिरीश बापट यांना सर्वच कट्ट्यावरील लोक मित्र मंडळी राजकीय लोक तसेच लहान मोठे कार्यकर्ते हे भाऊ म्हणून खाक मारत होते. तेही खक्काने त्याला उत्तर देत. आज शहरात अनेक कट्ट्यावर मैफली रमवणारे, किस्से करणारे भाऊ हरपल्याने सर्वच नेते मंडळी कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात दुःख झाले आहे.
हेही वाचा: Girish Bapat Death खासदार गिरीश बापट यांचे निधन सकाळी तब्येत होती चिंताजनक