पुणे- राज्यात आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन नागरिक करताना दिसत नाहीत त्यामुळेच कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांमध्ये पुणे अव्वल
राज्यात सध्या 52936 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. तर सध्या सर्वात ज्यास्त ऍक्टिव्ह केसेस पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात जवळपास 10 हजार 321 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर मुंबईमध्ये 5859 तर ठाण्यात 5983 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर विदर्भातील अमरावतीमध्ये 5229 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर अकोल्यात 1773, बुलढाणा 1553 आणि नागपूरमध्ये 6797 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सर्वात कमी कोरोनाबाधितांची संख्या गोंदिया आणि गडचिरोलीत आहेत. गोंदियात ४१ तर गडचिरोलीत ७४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
राज्यात नव्या रुग्णांची संख्या
राज्याचा रिकव्हरी रेट 94.96 इतका आहे रविवारी राज्यात 6971 नवे रुग्ण आढळले होते. राज्याचा कोरोना रुग्ण मृत्युदर 2.47 टक्के इतका आहे. राज्यात आत्तापर्यंत तपासणी केलेल्या चाचण्यांपैकी 13.36 टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात 2 लाख 42 हजार 563 लोक होम व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1731 नागरिक, इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आहेत.
आठ लाखांपेक्षा अधिक लोकांना लसीकरण
राज्यातल्या लसीकरण मोहिमेचा विचार केला तर राज्यात 20 फेब्रुवारीपर्यंत 8 लाख 97 हजार 413 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पहिला डोस आणि दुसरा डोस मिळून 97 हजार 70 इतके लसीकरण करण्यात आले आहे. पुण्यात 71 हजार 235, ठाणे 56 हजार 363, नाशिक 29 हजार 238, औरंगाबाद 19 हजार 120 आणि नागपूरमध्ये 30 हजार 733 लसीकरण करण्यात आलेले आहे.