पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज(रविवार) दिवसभरात 335 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 318 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील बाधित रुग्णांनी 7 हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर उपचारादरम्यान 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 276 वर पोहचली आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 6 पुरुष व 2 स्त्रियांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी पिंपरीतील पुरुष (वय - ६० वर्ष), आकुर्डी येथील दोन पुरुष (वय-४३ वर्षे), (वय-६८ वर्षे), सांगवीतील पुरुष (वय-५७ वर्षे), चर्होली बु. येथील स्त्री (वय-६१ वर्षे), मारुंजी पुरुष (वय-४८ वर्षे), बीड पुरुष (वय-९५ वर्षे), देहूरोड स्त्री (वय-४६ वर्षे) येथील रहिवासी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी, 4 हजार 312 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, आज बीड येथील 95 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आज 8 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर, दिवसेंदिवस वाढत जणाऱ्या कोरोना विषाणूची साखळी तोडण्याच्या हेतूने उद्या (सोमवार) मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची घोषणा या अगोदर झालेली आहे.