पुणे - शहरात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. शहरात आज (मंगळवारी) दिवसभरात एक हजार ८६ नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ७९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याचबरोबर आज ११ बाधितांचा मृत्यू झाला. त्यातील ५ रूग्ण पुण्याबाहेरील होते.
सध्या ३२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख १०हजार १६९वर पोहोचली आहे. तर सध्या पुण्यात ७०२० ॲक्टिव्ह रुग्ण असून एकूण ४ हजार ९०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण १ लाख ९८ हजार २४६ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आज ६०९० नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई -
दरम्यान, शहरात कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असताना महापालिकेने कोरोना नियम न पाळणाऱ्या आस्थपने, दुकाने, नागरिक तसेच लॅबवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सबरबन डायग्नोस्टिक या पॅथालॉजी लॅबला दहा हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ
मास्क न वापरणाऱ्या ६३ नागरिकांना दंड -
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ६३ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, टिळक रोड शाखा व अलका टॉकिज चौकामधील कार शो-रूमवर सुरक्षित अंतर न पाळल्याने दोन केस दाखल करत ५००० रुपये दंड करण्यात आला आहे. महापालिकेने मंगळवारी एकूण कोरोना नियम उल्लंघनाच्या ६५ केसेस दाखल करुन ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तर २० फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ, शनिवार पेठ, शाहू कॉलेज रोड परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५६९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण २ लाख ५८ हजार ६३० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सर्वच क्षेत्रांना फटका देणाऱ्या कोरोना महामारीला राज्यात १ वर्ष पूर्ण