बारामती (पुणे) - नुकत्याच जन्म झालेल्या सव्वा महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत टाकून देऊन तिचा संशयास्पद खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील माळेगाव येथील चंदन नगर येथे घडली.
... अनं बाळ पाळण्यात दिसलेच नाही -
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील विवाहित महिला दिपाली झगडे प्रसूतीसाठी चंदन नगर माळेगाव येथे आपल्या माहेरी आली होती. यावेळी महिलेने तिसऱ्यांदा एका मुलीला जन्म दिला होता. आज बुधवारी सव्वा महिन्याच्या मुलीला आई दिपालीने पाळण्यात झोपवून तीही झोपी गेली होती. मात्र, झोपेतून उठल्यानंतर पाळण्यात बाळ दिसले नाही. यावेळी त्यांनी आपल्या मुलीचा शोध घेतला. मात्र, त्यांना आपली मुलगी कुठेही मिळून आली नाही. यानंतर त्यांनी बाळाचे आजोबा संदीप जाधव यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात आपले बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाही, गरज पडल्यास कारवाई होणार'
तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच घराच्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास बारामती ग्रामीण पोलीस करीत आहे.