पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत. एकीकडे वाढत असलेली रूग्ण संख्या तर दुसरीकडे कमी पडत असलेल्या आरोग्य यंत्रणेनेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान तयार झाले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून फक्त बेड वाढवण्यात येत आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही मनुष्यबळ वाढवले जात नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ससूनमध्ये कोविड आणि नॉन कोविड रूग्णालयात काम करणारे 450पेक्षा अधिक निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. यात अत्यावश्यक सेवा, तसेच कोविड विषयी सर्व सुविधा सुरू असणार आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून निवासी डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे.
वर्षभरापासून मनुष्यबळ वाढवण्याची आहे मागणी -
पाहिल्या लाटेनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार आहे हे आरोग्य तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले गेले. मात्र, तरी देखील प्रशासनाने मनुष्यबळ वाढवण्यावर भर दिला नाही. आता दुसरी लाट सुरू झाली आहे तर, निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण दिला जात आहे. गेल्या वर्षभरापासून मनुष्यबळ वाढवण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या वर्षभरात 85 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तरीही ते सर्वजण या महामारीशी लढत आहेत. फक्त सरकारने मदतीसाठी अजून मनुष्यबळ द्यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.
वर्षभरापासून बंद आहे प्रशिक्षण -
ससूनमधील निवासी डॉक्टर हे गेल्या वर्षभरापासून कोविड-नॉन कोविड मध्ये काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण पूर्णपणे बंद आहे. जर त्यांना प्रशिक्षण दिले गेले नाही तर भविष्यात रूग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टरांचा 3 वर्षाचा कोर्स आहे. मात्र, यातील वर्ष फक्त कोविड ड्युटीमध्ये गेले आहे. वर्षभर त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. प्रशासन एमबीबीएस सारखे डॉक्टर नियुक्त करू शकते मात्र, तसे केले गेले नाही. आता पुन्हा दुसऱ्या लाटेत त्यांना कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आल्या आहे. आम्ही शिकायचे कसे आणि काय? असा प्रश्न या निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
वर्षभरापासून आहे कामाचा ताण -
वर्षाभरापासून कोविड ड्युटी बरोबरच नॉन कोविड काम देखील केले आहे. अनेकदा 18-18 तास काम केल आहे. याचा खूप मोठा शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर ताण पडत आहे. वेळ मिळत नसल्याने पुढील अभ्यास देखील करता येत नाही, अशी माहिती निवासी डॉक्टरांनी दिली.
ससूनमधील 450 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर -
गेल्या वर्षभरापासून आम्ही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोविड आणि नॉन कोविडची कामे करत आहेत. मात्र, कमी मनुष्यबळाच्या जोरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करून घेणे चुकीचे आहे. आता पुन्हा बेड वाढवले जात आहेत. आमचा त्याला विरोध नाही पण त्या बरोबर आवश्यक मनुष्यबळ देखील वाढवण्यात यावे. सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर डॉक्टर, नर्स, आया ही पदे भरण्यात यावीत, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.